सहकार बझार : इतिहास
सर्व जाती धर्मातील आणि सर्व सामान्यांना एकत्र घेऊन “कळवा को. ओप. कन्झुमर्स सोसायटी ली.” या प्राथमिक ग्राहक संस्थेची स्थापना दि. १२ मे १९४५ मध्ये केली. अन्नधान्याच्या टंचाईग्रस्त काळात जीवनावश्यक वस्तूचे वाटप गोरगरिबांना सुलभ आणि रास्त भावाने व्हावे, या उद्देशाने संस्थेची स्थापना झाली. अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे खुल्या बाजारात व्यापारी धन्याच्या किमती वाढवीत असत. त्यावेळी धान्याच्या किंमती कमी करून सोसायटीने धान्य विकण्यास सुरवात केली. त्यावेळी सोसायटीचे अवघे १९५ सभासद होते. शिधावाटप दुकानासोबत दुग्धव्यवसाय हे खाजगी क्षेत्राकडे असलेले क्षेत्र वारणा आणि शिवामृत दुध संघाकडून वितकरशिप घेऊन संस्थेने आपल्या ताब्यात आणले. सोसायटीची प्रगती सुरु झाली.
सद्या संस्थेची विक्री ३३.०० कोटींच्या वर आहे , सभासद संख्या ७२२१ तर भागभांडवल रु .८१.०० लाखाच्या वर आहे. संस्थेने मुख्य कार्यालय व कळवा शाखा इमारतीचे बांधकाम करून ४ मजली भव्य वास्तूमध्ये वातानुकुलीत शाखेचे दि.१५ मार्च,२०११ रोजी उद्घाटन करण्यात आले. नफा कमविणे हा संस्थेचा उद्देश नसल्याने संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये मालाच्या किमती कमी करून भाववाढीवर नियंत्रण मिळविले आहे. खुल्या बाजारामध्ये जेव्हा जीवनावश्यक मालाची टंचाई होते, त्यावेळेस संस्थेमध्ये कमीत कमी किमतीत प्रसंगी खरेदी दरामध्ये मालाची विक्री केली जाते. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने मागील भाजीपाल्याच्या भरमसाठ दरवाढीला आळा घालण्यासाठी संस्थेच्या शाखांमध्ये “स्वस्त भाजी विक्री केंद्र” चालू केली. संस्थेच्या सद्या १० स्वयंसेववा भांडारे, ९ दुध विक्री केंद्रे, २ मेडिकल स्टोअर्स व ६ शिधावाटप दुकाने यांमधून ग्राहकसेवा सुरु आहे.
संस्थेने पारसिक डोंगरावर संस्थेचे संचालक, सभसाद व कर्मचारी यांच्या माध्यमातून गेल्या २५-३० वर्षात दीड ते दोन लाख वृक्षांची लागवड केली आहे. तसेच संस्था सभासदांच्या पाल्यांना प्रोत्साहनपर दरवर्षी इयत्ता ५ वी ते पदवीधारक विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ रोख पारितोषिके वाटप करीत आहे. संस्था ईद, गणेशोत्सव, दीपावली, क्रिसमस, सणानिमित्त ग्राहकांना खरेदीवर विविध ग्राहक भेटवस्तू योजना आयोजित करीत असते. संस्थेने ध्येय स्वतःपुरतेच मर्यादित न ठेवता इतर संस्थानासुद्धा मार्गदर्शन करून, घाऊक दराने सदर संस्थाना मालाचा पुरवठा केला. आज त्या संस्था स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, याचा संस्थेस सार्थ अभिमान आहे. संस्थेच्या या भरीव कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन नागपूर येथे दि. १६ जानेवारी, २०१४ रोजी “सहकार भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कुशल नेतृत्व
मा.श्री. नारायण गजानन गावंड यांनी सन १९९१-९२ साली संस्थेच्या चेअरमन पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर संस्थेचे प्राथमिक ग्राहक भांडारातून दि. १२ मार्च १९९२ रोजी मध्यवर्ती ग्राहक भांडारामध्ये रुपांतरीत करण्यात यश मिळविले. त्या साली संस्थेचे तीन किराणा विभाग, शिधावाटप दुकाने व दुग्ध विभाग मिळून एकुण विक्री रु. ३.७४ कोटी व व्यापारी नफा रु. १९.२२ लाख होता. तर २७८८ सभासदांचे एकुण रु. ५.०४ लाख भाग भांडवल जमा होते. दि.१८/०६/१९९४ रोजी टाकोळी मोहल्ला, कळवा येथे भाडेतत्वावर जागा घेऊन स्वयंसेवा भांडार सुरु केले. दि.३१/०३/१९९४ अखेर संस्थेची एकुण विक्री ६.५१ कोटी झाली. सभासदांच्या मागणीनुसार दि.१२/०५/१९९४ रोजी कळव्यामध्ये मेडिकल स्टोअर्स सुरु करण्यात आले. छापली किमतीपेक्षा अत्यंत कमी दराने औषध विक्री करीत असल्याने बाजारपेठेतील इतर मेडिकल दुकानदारांनी संस्थे विरुद्ध अडचणी निर्माण केल्या. त्यांना समर्थपणे तोंड देऊन महाराष्ट्रात अत्यंत नावाजलेले मेडिकल स्टोअर्स म्हणून नावलौकिक मिळविला. सन १९९४ साली रु.५२.०० लाखांनी विक्रीची सुरवात करीत मेडिकल स्टोअर्सनी दि.३१/०३/२०१६ ची वार्षिक विक्री रु.३.५६ कोटी पर्यंत पोहचली आहे. सन १९९४ साली सिडको प्रशासनाकडून ऐरोली नवी मुंबई येथे ३३० चौ.मि. जागेचा प्लॉट खरेदी करून डिपार्टमेंटल स्टोअर्स सुरु करण्यात आले. ऐरोली शाखेची दि.३१/०३/२०१६ अखेरची वार्षिक विक्री रु.२.५६ कोटी आहे. ऐरोली प्रमाणे नेरूळ नवी मुंबई येथेही जागा खरेदी करून भव्य डिपार्टमेंटल स्टोअर्स सन २००० साली सुरु करण्यात आली. नेरूळ शाखेची दि.३१/०३/२०१६ अखेरची वार्षिक विक्री रु.२.४४ कोटी आहे. ग्राहकांच्या मागणी नुसार शाखा विस्तार करून सन २००४ या वर्षी विटावा,पोष्ट ऑफिस कळवा येथे भाडेतत्वावर जागा घेऊन स्वयंसेवा भांडार सुरु करण्यात आले. विटावा शाखेची मागील वर्षाअखेर विक्री रु.२.६६ कोटी आहे. खारेगाव शाखा क्र.२ येथील ग्राहकांचा प्रतिसाद पाहून विठ्ठल मंदिर खारीगाव येथेही भाडेतत्वावर जागा घेऊन स्वयंसेवा भांडार सन २००५ मध्ये सुरु करण्यात आले. त्या शाखेची मागील वर्षा अखेर विक्री रु.१.२० कोटी आहे. त्याचप्रमाणे पोष्ट ऑफिस कळवा, दिघा नवी मुंबई व आनंद विहार खारीगाव पूर्व येथे भाडेतत्वावर जागा घेऊन ग्राहक सेवा सुरु आहे. दि.३१/०३/२०१६ अखेर संस्थेची सभासद संख्या ७१६७, भागभांडवल रु.८१.७८ लाख असून संस्थेच्या १० शाखा, ६ शिधावाटप दुकान,दोन मेडिकल स्टोअर्स व दुध विक्री मिळून रु.३३.४१ कोटी चे वर विक्री करीत आहोत.ग्राहकांना कमीत कमी दरात चांगल्या प्रतीचा निर्भेळ माल पुरवठा करून बाजार भावावर नियंत्रण ठेवणे हा संस्थेचा उद्देश साध्य झाल्यामुळे दि.१६/०१/२०१४ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे सहकार भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. याचे श्रेय कुशल नेतृत्व असलेले संस्थेचे मा. चेअरमन श्री.नारायण गावंड व संचालक मंडळ यांना मिळत आहे.